शेणकिडा...

शेणकिडा: कीटक वर्गातील एक प्राणी. कोलिऑप्टेरा गणातील स्कॅरॅबिइडी कुलात त्याचा समावेश होतो. भारतात त्याच्या तीन जाती आढळतात.
शेणकिडा काळया किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या शरीराचे शीर्ष (डोके), वक्ष (छाती) व उदर ( पोट) असे तीन प्रमुख भाग पडतात. डोके रुंद व चपटे असते. शृंगिका ( सांधे असलेली लांब स्पर्शेंद्रिये ) आखूड, जबडे नाजूक व ओठांवर बारीक केस असतात. त्यास पायाच्या तीन जोडया असतात. पायाच्या दुस-या व तिस-या जोडीमध्ये अंतर असते. उदर 9-10 खंडांचे बनलेले असते. पंखांची पहिली जोडी जाड टणक असते; पण ती त्यांना उडण्यास उपयोगी पडत नाही. ती उदरावर पसरते व उदराचे रक्षण करते. पंखांची दुसरी जोडी पातळ व नाजूक असून तिचा उपयोग उडण्यासाठी होतो. इतर वेळी ती पहिल्या पंखांच्या जोडीच्या आत घडी घातल्याप्रमाणे दिसते.
रवंथ करणा-या प्राण्यांच्या ताज्या शेणाच्या वासामुळे हे कीटक शेणाकडे येतात. त्यांच्या चपटया डोक्याच्या साहाय्याने ते शेणाचा छोटासा भाग वेगळा करतात. त्यास जबडा व पायाच्या साहाय्याने गोल आकार देतात. हा शेणाचा गोळा ते पाठीमागच्या पायाने पुढे ढकलतात व पुढचे पाय जमिनीवर टेकवितात. कीटक उलटा पुढे पुढे सरकत जातो व अशा रीतीने शेणाचा गोळा सु. अर्धा किमी. अंतरापर्यंत तो ढकलत नेतो. कीटकाच्या आकारापेक्षा तिप्पट मोठा शेणाचा गोळा असू शकतो. नर कीटक बीळ तयार करतो. त्यावेळी मादी शेणाच्या गोळयांचे संरक्षण करते. बीळ तयार झाल्यावर मादी गोळा बिळाकडे ढकलते. शेणाचे गोळे बिळात साठविले जातात. मादी त्यावर अंडी घालते. अंडयातून बाहेर पडलेल्या अळया साठविलेल्या शेणाच्या गोळयाचा अन्न म्हणून उपयोग करतात. कोशावस्थेतून बाहेर पडण्यास साधारणत: वर्षाचा काळ लागतो. जमीन टणक असेल, तर पावसाने भिजून मऊ होईपर्यंत ते बाहेर पडू शकत नाहीत.
हे कीटक हजारो टन शेण गोळयांच्या स्वरूपात बिळात साठवितात व अन्न म्हणून वापरतात. वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी होण्यास त्यांची अप्रत्यक्ष मदतच होते. पाटील, चंद्रकांत प.

0 comments: